सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; शेतकऱ्यांनी दिली बाजरीसह भाताला अधिक पसंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सून चांगला बरसल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. जून महिना संपण्यापूर्वीच १ लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ५० इतके झाले आहे. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणीचा अंदाज आहे. तर सध्या भात लागण, बाजरी, ज्वारी, मका पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन पीक हंगाम घेण्यात येतात. यामधील सर्वात मोठा हंगाम खरीपचा असतो.

यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हाजर हेक्टर, ज्वारी ११ हजार, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ आणि सोयाबीनचे ७४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. तर नागली, तूर, मूग, उडीद, तीळ, कारळा, सूर्यफूलचे क्षेत्र अत्यल्प असते. यावर्षी मान्सूनचा पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीलाच दाखल झाला. तसेच आतापर्यंत बहुतांशी तालुक्यात चांगले पर्जन्यमान झाले आहे.

यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. तरीही अनेक भागात पावसामुळे जमिनीला वापसा नाही. त्यामुळे पेरणी रखडली आहे. असे असलेतरी आतापर्यंत ५० टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. पश्चिम भागात पाऊस चांगला झाल्याने भात लागणीला वेग आला आहे. आतापर्यंत सुमारे १७ हजार हेक्टरवर लागण झाली. हे प्रमाण ३८ टक्के आहे.

ज्वारीची पावणे चार हजार हेक्टरवर पेरणी

ज्वारीचीपावणे चार हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दुष्काळी तालुक्यात बाजरी हे हक्काचे पीक असते. त्यातच माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने बाजरीची आतापर्यंत ३८ टक्के पेरणी झाली. २३ हजार ३०० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.

पाटण तालुक्यात खरीपाची ‘इतके’ टक्के पेरणी

माण तालुक्यात सर्वाधिक १४ हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. यानंतर खटाव आणि खंडाळा तालुक्यात बाजरी पेरणी अधिक झाली आहे. मकेचीही ३६ टक्के पेरणी झाली आहे. सध्या साडे पाच हजार हेक्टरवर मका पेरणी आहे. पाटण तालुक्यात खरीपातील पेरणी सर्वाधिक ८० टक्के झालेली आहे. तर कराड तालुक्यात ७१, खंडाळा ५३, सातारा ४९, कोरेगाव तालुका ४४, खटाव ४१, माण ४०, जावळी तालुका ३२, वाई २९ आणि फलटण तालुक्यात २८ टक्के पेरणी झालेली आहे. महाबळेश्वर तालुक्यात खरीपचे क्षेत्र कमी असते. तालुक्यात भात नागली, तृणधान्य, कडधान्ये घेतली जातात. सध्या तालुक्यात पेरणीचे प्रमाण शुन्य टक्के आहे.

भुईमूग 71, सोयाबीनची 81 टक्के पेरणी पूर्ण..

सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख पिकांमध्ये भुईमूग आणि सोयाबीन पिकांचा महत्वाचा समावेश होतो. भुईमुगाची सुमारे २१ हजार हेक्टरवर लागण झाली आहे. हे प्रमाण ७१ टक्के आहे. तर सोयाबीनची ६० हजार हेक्टरवर पेर झाली. हे प्रमाण ८१ टक्के आहे. सोयाबीनची सातारा तालुक्यात १२ हजार हेक्टर, जावळी ५ हजार २००, पाटण तालुका सुमारे १० हजार हेक्टर, कऱ्हाड १६ हजार, कोरेगाव साडे सहा हजार हेक्टर, खटाव तालुका पाच हजार तर वाई तालुक्यात साडे तीन हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झालेली आहे.