सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हा निर्णय घालण्यात आला असून दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत टॅगिंग करणे बंधनकारक होते. आता ही मुदत ३१ मे २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे टॅगिंग असल्याशिवाय शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पशुधन शेतकऱ्यांकडे इअर टॅगिंगसाठी अवघे पाच दिवस उरले आहेत.
सातारा जिल्ह्यात इअर टॅगिंगचे काम सध्या अपशुसंवर्धन विभागाच्या वतीने दवाखान्यातून केले जात आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार इअर टॅगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे जनावरांची जन्म- मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.
योजनांच्या लाभासाठी इअर टॅगिंग बंधनकारक : डॉ. दिनकर बोर्डे
इअर टॅगिंग आणि त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करण्यात आले आहे. अवघे पाच दिवस नोंदणीसाठी बाकी राहिलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील एकूण जनावरांपैकी 6 लाख जनावरांचे भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंगचे काम आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडून आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग करण्यात आलेले नाही, अशांनी जनावरांची नोंद प्रणालीवर करून घ्यावी, असे आवाहन केले असल्याची माहिती सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
१ जूनपासून प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी
पशु संवर्धन विभागाकडून इअर टॅगिंगची दि. १ जून २०२४ पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याशिवाय कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय मालकांना नुकसान भरपाई मिळणार नाही. विक्रीकरिता वाहतूकही करता येणार नाही.
उपचारासह योजनांचा लाभ मिळणार नाही…
भविष्यामध्ये येणाऱ्या पशुधनाच्या योजना यांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे हि नोंदणी करणी बंधनकारक असणार आहे. हि नोंदणी असल्याशिवाय सरकारी रुग्णालयात जनावरांवर उपचार केले जाणार नाहीत.
‘इअर टॅगिंग’ म्हणजे काय?
राज्य सरकारकडून दुधाळ गाईंचे ‘इअर टॅगिंग’ झालेले असेल तरच अनुदान लाभ, खरेदी विक्री करता येणार असल्याची अशी अट घातली आहे. अर्थात इअर टॅगिंग’ म्हणजे काय तर आपल्या गायींच्या किंवा जनावरांच्या कानांना पशुपालन विभागाकडून लावला जाणारा पिवळा बिल्ला किंवा पिवळा टॅग होय. या माणसाला ज्याप्रमाणे आधारकार्ड असते. अगदी त्याच पद्धतीने पिवळा टॅग म्हणजे त्या संबंधित जनावराचे आधारकार्ड असते. तो जनावरांच्या कानांना जोडला जाऊन, त्या जनावराची सर्व माहिती विभागाला एका क्लिकवर उपलब्ध होते.