कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराकडून पंधरा दिवसात सर्व खड्डे मुजवण्यात येतील, अशी लेखी हमी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही खड्डेे कायम असून अपघातांची मालिका कायम असल्या कारणाने आक्रमक झालेल्या बेलवडे गावातील ग्रामस्थांसह शेतकर्यांनी महामार्गावर उतरून अचानकपणे रास्तारोको केला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
घटनास्थळी तळबीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्ग ठेकेदाराला घटनास्थळी बोलवण्याची मागणी केली. ठेकेदार घटनास्थळी आला तरच आंदोलन मागे घेतले जाईल, अशी भूमिका घेतली. तसेच ठेकेदाराकडून आम्हाला लेखी हमी देण्यात आली होती. लेखी हमी देऊनही महामार्गावरील खड्डे कायम आहेत. त्यामुळे आता आम्ही महामार्गावरून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र हे आंदोलन अर्धा तास सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर व कराड तालुक्यातील शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी या ठिकाणाहून जात असताना त्यांची चारचाकी महामार्गाच्या बेलवडे हवेली परिसरात खड्डे पडलेल्या ठिकाणीच बंद पडली होती. त्यावेळी त्यांच्यासमोरच परिसरातील एक दुचाकीस्वार घसरून पडला आणि त्यात तो जखमी झाला. यावेळी बेलवडे हवेली ग्रामस्थांसह शेतकर्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघातस्थळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी धाव घेत दुचाकीस्वारास मदत केली.
यावेळी बेलवडे ग्रामस्थांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांना महामार्ग ठेकेदारास वारंवार सांगूनही लक्ष देत नाही, असे सांगितले. शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकार्यांनाही महामार्ग ठेकेदाराने 15 दिवसात सर्व खड्डे मुजवू, अशी लेखी हमी दिली होती याची आठवण करून दिली. मात्र हे आश्वासन न पाळता महामार्गावर अजूनही खड्डे कायम आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी व बेलवडे हवेली ग्रामस्थांनी अचानक पुणे-बंगळूर महामार्ग रोखून धरला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अचानक महामार्ग रोखल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.