पाटण प्रतिनिधी | कोयना विभागातील सध्या रान गव्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीच्या पिकांचे नुकसान केले जात आहे. दरम्यान गत आठवड्यात लेंढोरी गावात सुतारवस्तीनजीक प्रकाश पाटील यांच्या शेतामध्ये 20 ते 25 गव्यांच्या कळपाने चार एकरातील कलिंगडची शेती अक्षरशः उद्ध्वस्त केल्याने पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सदर शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी त्याने नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. हातातोंडाशी आलेला घास गवा रेड्यांनी हिसकावून घेतल्याने शेतकर्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वन विभागाने गव्व्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
या जंगली जनावरांपुढे शेतकरी पुरता हतबल झाला असून तो मेटाकुटीला आला आहे. या वन्यप्राण्यांना अटकाव करण्यास वनविभाग कोणतीच उपाययोजना करत नसल्याने वनविभागाविरोधात शेतकरी संतप्त झाला आहे. या नुकसानीचा वनविभागाचे अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा केला आहे.
येथील शेतकरी आपल्या शेतात काबाडकष्ट करून शेतात पीक घेतो. आपल्या कुटुंबाची गुजराण करतो. शेतीवरच शेतकर्याचे जीवनमान अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील सर्वच विभागामध्ये जंगली जनावरांनी हैदोस घातला आहे. या रानटी जनावरांकडून कधी मानवावर हल्ला केला जातो, तर कधी शेतातील पिकांची नासधूस केली जाते. असे प्रकार सातत्याने तालुक्यात सुरूच आहेत. वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे गवे, रानडुक्कर आदी हिंस्त्र वन्यप्राण्यांचे कळप शेतीची नासधूस करत आहेत. त्याचबरोबर वन्यप्राण्यांकडून शेतकर्यांवरील हल्ल्यात देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.