कराड प्रतिनिधी । पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी भुसुरुंगाचा स्फोट केल्यानंतर दगड उडून लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दत्तात्रय पांडुरंग बामणे (वय ५५, रा.कार्वे, ता. कराड), असे दगड लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कार्वे येथे शुक्रवारी, दि. ११ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात योजनेचे अधिकारी, ठेकेदार, भुसुरुंग स्फोटाचे काम करण्याकरिता वापरलेल्या वाहनाचा चालक व मालक, तसेच कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत धीरज दत्तात्रय बामणे याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. कार्वे ते कोडोली जुना रस्ता येथील शिवारात गत महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत पेयजल योजनेच्या विहिरीचे काम चालू आहे. त्या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी सुरुंगाचा वापर करून अधूनमधून स्फोट करण्यात येत असतो.
शुक्रवारी, दि. ११ सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय बामणे हे त्यांच्या शिवारातील शेतात गेले होते. त्यांच्या शेताच्या जवळच पेयजल योजनेच्या विहिरीचे काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विहीर खोदण्यासाठी भुसुरुंगाचा स्फोट करण्यात आला. त्यावेळी स्फोटात वेगाने उडालेला दगड दत्तात्रय बामणे यांच्या पाठीवर उजव्या बाजूला जोराने लागल्याने त्यांच्या बरगड्या तुटून फुप्फुसामध्ये रक्तस्राव झाला. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात येत असताना वाटेतच दत्तात्रय बामणे यांचा मृत्यू झाला.