आले पिकावर फवारताना कीटकनाशक पोटात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शेतातील आले पिकावर कीटकनाशक फवारणी करत असताना ते असताना नाका – तोंडातून पोटात गेल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मंगळवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. यवतेश्वर, ता. सातारा येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

युवराज पोपट पवार (वय ३५, रा. यवतेश्वर, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, युवराज पवार हे नोकरी करत शेती करत होते. यवतेश्वर येथील आंबा नावाच्या शिवारात त्यांनी आल्याची लागवड केली आहे. बारा  दिवसांपूर्वी या  आल्याच्या पिकावर क्लोगार्ड  नावाचे कीटकनाशक त्यांनी फवारले. त्यावेळी त्यांना फारसे काही जाणवले नाही. मात्र, त्याच दिवशी रात्री तीनच्या सुमारास त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

कीटकनाशक त्यांच्या संपूर्ण शरीरात भिणल्यामुळे त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मेंदवावर झाला. उपचाराला त्यांचा प्रतिसाद कमी होऊ लागला. त्यानंतर खासगीरुग्णालयातून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवार, दि. १९ रोजी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बारा दिवसांनंतर त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. साताऱ्यातील तहसील कार्यालयामध्ये ते स्टॅम्प वेंडर म्हणून काम करत होते. सातारा तालुका पोलिस ठाण्यात त्यांचे भाऊ अमर पोपट पवार (वय ३१, रा. यवतेश्वर) यांनी खबर दिली असून, पोलिस नाईक मालोजी चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.