सातारा प्रतिनिधी । संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुक 2024 मध्ये विजय मिळवला आहे. उदयनराजेंनी मोठ्या चुरशीने पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त काबीज केले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांचा त्यांनी सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला. विजयानंतर उदयनराजेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत “लाखो समर्थकांची पाठीशी पॉवर; अशी-तशीच उडवत नाही कॉलर!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सत्यता लोकसभा मतदार संघात विजय मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टद्वारे विरोधकांवर थेट निशाणा साधला आहे. आपल्या कॉलर उडवण्याच्या हटके स्टाईलने चर्चेत असलेल्या उदय राजेंना निवडणुकीच्या काळात शरद पवार यांनी कॉलर उडवत थेट आव्हान दिले होते. आता प्रत्यक्षात उदयनराजेंनी कॉलर उडविण्याबाबतची फेसबुक पोस्ट केली आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीत मतदानास सुरुवात होताच सुरुवातीला पोस्टल मतदान मोजणीसाठी घेण्यात आले. मात्र, हा कौल उदयनराजेंच्या विरोधात गेला होता. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी मताधिक्य घ्यायला सुरूवात केली. काही फेर्यांमध्ये त्यांनी आघाडी घेतली होती. मात्र, दुपारनंतर खा. उदयनराजेंनी मताधिक्य घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. ही मताधिक्याची घोडदौड अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली.
उदयनराजेंच्या विजयाचा वारु अखेरपर्यंत आ. शशिकांत शिंदे यांना रोखता आला नाही. उदयनराजे विजयी होताच राजधानी सातार्यात जल्लोषाला सुरूवात झाली. राजेंच्या मावळ्यांनी फटाके फोडले, गुलाल उधळला. राजधानीत राजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार रॅली काढत विजय साजरा केला.
साताऱ्यात भाजपचा पहिला खासदार
स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपला कधीच स्थान मिळाले नव्हते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा लोकसभेसाठी भाजपचा पहिला खासदार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील भाजपची वाढलेली ताकद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत ही उदयनराजेंसाठी महत्त्वाची राहिली.