सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल सातारा जिल्हा दौरा पार पडला. त्यांनी कराड अन् फलटणमध्ये कार्यक्रमांना हजेरी लावली. एवढंच नाही तर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचं तोंड भरून कौतुक देखील केलं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फडणवीसांचा जिल्हा दौरा हा तसा महत्वाचाच मानला जात होता. कारण या दौऱ्यावेळी भाजपकडून लोकसभेच्या उमेदवाराची चाचपणी व घोषणा होईल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, त्या दृष्टीने तसे संकेत देखील फडणवीसांकडून दिले गेल्याचे पहायला मिळाले. मात्र, फडणवीसांच्या दौऱ्यापेक्षा जास्त चर्चा ही फलटण अन् सातारच्या खासदार राजेंची होऊ लागली आहे. कारण खा. उदयनराजे तब्बेत बरी हाय नव्हं? असं खुद्द रामराजेंनी असे म्हंटले. याबाबतची एक फेसबुक पोस्ट खा. उदयनराजेंनी केली आहे.
काळज येथे निरा देवधर कालव्याच्या भूमिपूजन समारंभासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे दाखल झाल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काळज येथे जाऊन ना. फडणवीस यांची भेट घेत फलटणचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरामध्ये येण्याचे निमंत्रण दिले व देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते मान्य करत काळज येथील कार्यक्रम झाल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विनंतीला मान देऊन फलटण येथील श्रीराम मंदिरामध्ये ते आले श्रीराम मंदिरामध्ये येताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचे सारथ्य हे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले होते.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा दौरा संपल्यानंतर राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी थेट श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची फलटण येथे भेट घेतल्याने विविध चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. लक्ष्मीविलास पॅलेसवर दाखल झाला आणि रामराजेंच्या निवासस्थानी उदयनराजे यांनी अचानकपणे भेट घेऊन सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. तत्पूर्वी या दोघा जणांनी एकमेकांना नमस्कार करून अदबीने विचारपूस केली. स्मित हास्य करीत फोटोसाठी पोज सुद्धा दिली. मात्र बंद दाराआड काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघा जणांची जवळीक वाढल्याचे चित्र दिसत असून ही जवळीक कुणाला मारक ठरणार असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे. काही महिन्यांपूर्वी सातारा शासकीय विश्रामगृहात आणि आता आज झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघांमधून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रबळ दावेदार आहेत. परंतु राज्यामध्ये झालेल्या महायुतीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडे आहे. सातारा लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कर्जत येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. या सर्व गोष्टींचा विचार करता सातारा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे व माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडे येणार का ? अशा चर्चा सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात सुरू झाल्या आहेत.