सातारा प्रतिनिधी | रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी सातारा प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने नेत्र आणि आरोग्य तपासणी शिबिर महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आज, दि. 10 रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहे. यामध्ये वाहनचालकांची सदोष दृष्टी, ही मुख्य समस्या आहे. रिक्षा, ट्रक, टॅक्सी चालकांकडून होणार्या अपघातांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने रस्ते व परिवहन मंत्रालयाने विशेष पावले उचलली आहेत.
मंत्रालयाच्या निर्देशांनुसार सातारा परिवहन कार्यालयातर्फे विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (दि. 10) सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नेत्र आणि आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. या शिबिरात दृष्टिदोष आढळणार्या चालकांना त्यांच्या नंबरचे चष्मे तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.