ई-केवायसीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळाला दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना दि. ३० सप्टेंबरपर्यंत ई केवायसी करून घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार काही शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी करून घेतली. त्यानंतर आता अशासनाने ई केवायसी करून घेण्यासाठीची मुदत वाढवली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे ई केवायसी बाकी राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळालेला आहे.

सातारा जिल्ह्यात अद्याप १२ लाखांहून जास्त ई-केवायसी प्रलंबित आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमांतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गोरगरीब लाभार्थ्यांना अन्नधान्य पुरविले जाते. त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर अन्नधान्य वाटप केले जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई- केवायसी करण्याची अट घातली जेणे करून बनावट लाभार्थ्यांना अटकाव करता येईल.

त्यानुसार शासनाच्या वतीने शिधापत्रिकांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठी शिधापत्रिकांना मुदतीत ई-केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याबाबत शासन, जिल्हा पुरवठा विभाग आणि दुकानदारांकडून वारंवार शिधापत्रिकांना आवाहन करण्यात येत होते. यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत दिलेली मुदत संपत शिधापत्रिकाधारकांमध्ये आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

शासनाने ही मुदत आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. शिधाधारकांना दिलासा मिळाला आहे. शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर कुटुंबातील कोणत्या सदस्याची ई-केवायसी झाली की नाही हे तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी ई- केवायसी केलेली नाही त्यांचे रेशनकार्ड येत्या १ नंबरपासून बंद होणार आहे.

तालुकानिहाय प्रलंबित ई-केवायसी

१) जावली : ५५५०७
२) कराड : १९६११७
३) खंडाळा : ५२२६३
४) खटाव : १०८०८५
५) कोरेगाव : ११६१२६
६) माण : १२३२८८
७) पाटण : १४७९९९
८) फलटण : १४३३२०
९) सातारा : १६२७७७
१०) महाबळेश्वर : ३६०४९
एकूण : १२०६४२४