सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये सरासरीच्या 40 टक्के पाऊस झाला आहे. हंगामातील अपूरा पाऊस, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीमुळे विमा संरक्षण दिले जाते. सातारा जिल्हयातील तब्बल 1 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. पीक विमा पोर्टल व नेटवर्कच्या अडचणीमुळे राज्य शासनाने पीक विमा भरण्यासाठीच्या मुदतीत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास दिला होता. त्यास मंजूरी मिळून आता एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना दि. ३ ऑगस्ट रोजी पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
सध्या पावसाच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास अपुऱ्या पावसामुळे भविष्यात पिकांच्या उत्पादनात घट आल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. पिक विमा भरल्यावर अपुरा पाऊस, पावसाचा खंड इत्यादी कारणांमुळे पिकांचे होणारे नुकसानी पोटी पिक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळू शकते. पिक विमा भरण्याची मुदत वाढून 3 ऑगस्ट झाली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकरी विजय माईनकर यांनी केले आहे.
नेमका विमा कोठे भरावा?
जिल्हयातील सर्व CSC केंद्र / महा ई सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र. सर्व राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक. शेतकरी विमा संरक्षणासाठी वेब पोर्टलद्वारे थेट अर्ज करु शकतील त्यासाठी पिक विमा पार्टलवर. सातारा जिल्हयासाठीची ओरिएन्टल इन्शुरन्स ही विमा कंपनी असून विमा कंपनीचा टोल फ्री नंबर : 1800118485 असा आहे.
एक रुपया विमा हप्त्यांमध्ये नक्की किती मिळणार विमा संरक्षित रक्कम?
भात (तांदुळ) 41 हजार रुपये, ज्वारीसाठी 20 हजार रुपये, बाजरीसाठी 18 हजार रुपये, नाचणीसाठी 20 हजार रुपये, भूईमूगकरिता 40 हजार रुपये, सोयाबीन 32 हजार रुपये, मूग 25 हजार 817 रुपये उडीद, 26 हजार रुपये, कांदा 46 हजार रुपये आहे. अशा प्रकारे एक रुपया विमा हप्त्यांमध्ये विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी पिकावर मिळणार आहे.