सातारा प्रतिनिधी । केंद्रीय सैनिक बोर्डाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचे आर्थिक मदतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केले जातात. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक मदतीच्या योजनांचे अर्ज सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/युध्द विधवा/ विधवा/वीर माता/वीर पिता यांनी आपली नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी माजी सैनिकांसाठी केलेल्या महत्वाच्या आवाहनाचा लाभ जास्तीत जास्त माजी सैनिकांनी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, माजी सैनिकांच्या सर्व अवलंबितांची ओळखपत्रे देण्याची कार्यवाही आजपासून सुरू करण्यात आली आहेत.
त्यामुळे सर्व माजी सैनिकांनी व त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तींनी आपली व आपल्या अवलंबितांची नोंद ऑनलाईन पद्धतीने करून त्याची प्रिंट सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे येताना सोबत घेऊन यावी ,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.