कराड प्रतिनिधी | येरवळे त. कराड गावचे सुपुत्र जवान सुरज मधुकर यादव यांचे आसाम येथील दिवापूर येथे सेवा बाजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी येरवळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वीर जवान सुरज यादव यांच्या कुटुंबीयांची नुकतीच भेट घेत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण, येरवळे चे माजी सरपंच सुभाषराव पाटील आदीच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असून जिल्ह्यातील काही गावे सैनिकांचं गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. सुरज यादव यांचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत. सैन्याप्रती एक सदभावना आपल्या देशातील सर्वच नागरिकांच्या मनात कायम असतो त्यामुळे सैनिकांच्या त्यागाला कायमच आपण सर्वजण सलाम करीत असतो.
एक शांत व संयमी आणि सर्वांशी मनमिळावू स्वभाव असलेले तसेच देशाप्रती तितकीच समर्पणाची भावना असलेले सुरज यादव यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांच्या व येरवळे ग्रामस्थांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामधून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.