सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या इथेनॉलच्या टँकरच्या टायरने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. अचानक टँकरच्या टायरने पेट घेतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. दरम्यान, या घटनेत टँकरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तर पोलीस व स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गारून जरंडेश्वर कारखान्याहून (एमएच ४२ बीएफ ०३२१) हा चौदाचाकी टँकर इथेनॉल घेऊन कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे निघाला होता. वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत टँकर आला असता टँकरच्या क्लीनर साइडचे मागील सहा टायर पेटल्याचे चालकाच्या लक्षात आले. यानंतर चालकाने तत्काळ महामार्गावरच टँकर थांबवला. टँकर चालक व स्थानिकांनी याबाबतची माहिती तत्काळ भुईज पोलिसांना दिली.
घटनेची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांना मिळताच त्यांनी पोलिस यंत्रणेला सूचना देत महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवली. तसेच पाचगणी नगरपालिका, वाई नगरपालिका, सातारा नगरपालिका आणि किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाडयांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दोन ते तीन तासानंतर अग्निशामक यंत्रणेच्या साहाय्याने टँकरला लागलेली आग विझविण्यात यश आले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.