सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात पर्यावरण प्प्रेमींच्यावतीने एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. दुकानांचे नामफलक दिसत नाहीत म्हणून दीड दशके वाढलेली झाडे तोडण्याचा उद्योग राजपथावरील काही व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. यावर आळा बसावा यासाठी पर्यावरण प्रेमींनी मंगळवारी निदर्शेने केली.
या आंदोलनावेळी हरित सातारा ग्रुपचे कन्हैय्याला राजपुरोहित, अमोल कोडक, प्रकाश खटावकर, महेंद्र बाचल, उमेश खंडूझोडे, निखील घोरपडे, भालचंद्र गोताड, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोइटे, असिफ खान, ड्रोंगोचे सुधीर सुकाळे, विकास बहुलेकर, अनिकेत जगताप, इंद्रजीत इंदलकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, जगन्नाथ कवळे, विनायक माटल, सुरेश झेपले यांनी उपस्थिती लावली होती.
सातारा शहरातील राजपथावर विविध सामाजिक संघटना, संस्था, नवरात्रोत्सव आणि गणेश मंडळांच्या सहकार्याने वृक्षासोपण करत त्या वृक्षांना जगविण्यात आले. पंधरा फुटांपेक्षा उंच झालेल्या या झाडांनी राजपथाच्या साैंदर्यात भर टाकली होती. परंतु व्यापाराच्या निमित्ताने राजपथावर येणाऱ्या काही व्यावसायिकांना वृक्ष जाळून मारण्याचे प्रकार केले. या प्रवृत्तींना वेळोवेळी पर्यावरणप्रेमींनी हटकले आहे. परंतु, नव्याने सुरू होणाऱ्या दुकानासमोर वृक्ष तोडण्याच्या हालचाली दिसल्यानंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले. लोकशाही मार्गाने आंदोलन करून त्यांनी हे झाड तोडले जाऊ नये यासाठी पालिका प्रशासनाची भेट घेतली. यावेळी राजपथावरील कोणत्याही झाडाला धक्का लागु देणार नाही, असे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.