कराड प्रतिनिधी । प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेबरोबर स्वतःच्या सीमित परिसराची स्वच्छता बाळगली तर काय होऊ शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कराड शहर होय. स्वच्छ शहराचा देश पातळीवर मिळालेला पुरस्कार ही त्याचीच पोचपावती आहे. आता एवढ्यावर थांबून चालणार नाही तर स्वच्छतेचा बालसंस्कारच आता रुजविणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही साळुंखे महाविद्यालयाच्या माध्यमातून कराड शहरात येत्या वर्षभरासाठी प्लास्टिक निर्मूलनाचा संकल्प करत आहोत, असे प्रतिपादन बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांनी केले.
कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या पुनीत सागर अभियान आणि ग्रीन क्लबच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी प्रा.रत्नाकर कोळी, प्रा.युवराज कापसे, प्रा.स्नेहलता वरेकर आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जे.पी.सत्तीगिरी आणि ॲडम ऑफिसर कर्नल दिनेश कुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वर्षभर सदर अभियान राबवित आहोत. २००५ आणि २०२१ या वर्षीच्या पूरसदृश्य परिस्थितीला बऱ्याच अंशी प्लास्टिक पिशव्या, कचरा जबाबदार होता. यासाठीच प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी आणि कापडी पिशव्या वापरणे गरजेचे आहे.
कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.सुभाष कांबळे, प्रा.सुरेश यादव, प्रा.अवधूत टीपुगडे, प्रा.अण्णासाहेब पाटील, डॉ.प्रवीण साळुंखे यांच्यासहित सर्व प्राध्यापक विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
1500 कागदी पिशव्यांचे वाटप
तत्पूर्वी पर्यावरण संरक्षण संदर्भात शपथ घेतल्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कराड शहरातून प्लास्टिक निर्मूलन जनजागृतीसाठी घोषणा देत भव्य रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाविद्यालयात तयार केलेल्या १५०० कागदी पिशव्यांचे वाटप कराड बाजारपेठेत करण्यात आले. यानंतर प्रीतीसंगम घाट परिसरात कृष्णा नदी तीरावरील स्वच्छता विद्यार्थ्यांमार्फत केली गेली. यामध्ये जवळपास ३५ किलो पेक्षा अधिक प्लास्टिक कचरा गोळा केला. विशेषतः पर्यावरणास घातक कचऱ्याचे निर्मूलन केले गेले. तसेच तेथील स्थानिक लोकांना व पर्यटनास आलेल्या पर्यटकांना प्लास्टिक निर्मूलन संदर्भात जाणीव जागृती करण्यात आली.