सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास्थळी शरद पवार जेव्हा साताऱ्यात दाखल झाले तेव्हा त्यांच्या 007 या कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी असलेल्या 007 या गाडीतून खासदार पवारांची कार्यक्रमस्थळी एन्ट्री झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शरद पवार जेव्हा जेव्हा सातारा दौऱ्यावर येतात तेव्हा त्यांची एक खास गाडी त्यांच्या स्वागतासाठी तयारीत असते. मात्र, आज त्यांना 007 या नंबरच्या कारची विशेष सोय करण्यात आली होती. ही कार कराडमधून खास मागवण्यात आली आहे.
साताऱ्यात 007 नंबरची गाडी म्हटलं की आठवण येते ती भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची. मात्र, आज खासदार शरद पवार यांनी उदयनराजे प्रवास करीत असलेल्या कारमधून आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांसाठी सातारा दौऱ्यावर आलेल्या पवारांनी सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्यास उपस्थिती लावली. महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित राहत मनोगत व्यक्त केले. सोहळ्यानंतर 007 या गाडीतून ते प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दीमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहिले.
दरम्यान, साताऱ्यातील कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे निवासस्थानी शरद पवार भेट देणार आहेत. या ठिकाणी आगामी निवडणुकीसाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. सायंकाळी रयत शिक्षण संस्थेच्या काले येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पवारांच्या हस्ते होणार आहे.