सातारा प्रतिनिधी | पुण्यावरून कोल्हापूरकडे निघालेल्या डेमू या लोकल रेल्वेच्या ब्रेकमध्ये रविवारी बिघाड झाला. ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने ही रेल्वे कोरेगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. ब्रेकच्या दुरूस्तीचे काम दोन तास चाललल्याने पुणे-मिरज या रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती.
पुणे ते कोल्हापूर ही दैनंदिन लोकल रेल्वे आहे. ही रेल्वे दुपारी २.३५ वाजता सातारा रेल्वे स्थानकावर आली. येथेच लोकोपायलटला रेल्वेच्या डब्यांना ब्रेक लागत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वेगावर नियंत्रण मिळवत ही रेल्वे कोरेगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात यश मिळवले. यानंतर लोकोपायलटने ही माहिती वरिष्ठांना दिली. यानंतर सहाय्यक फौजदार अजय लोहार, डी. बी. पाटील, हवालदार दीपक घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर कोरेगाव स्टेशन प्रबंधकांना याची कल्पना दिली.
यानंतर पुढील कार्यवाही करून दुरूस्तीचे काम करण्यात आले. या दुरूस्तीच्या कामासाठी तब्बल २ तासांचा कालावधी गेला. पुणे येथून दुपारी एक वाजता सुटलेली मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस सातारा स्थानकावर दीड तास थांबवून घेण्यात आली. कोरेगावातून पुढे जाण्यासाठी तिला मार्ग उपलब्ध नसल्याने साताऱ्यात थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.