‘युनेस्को’चे पथक देणार प्रतापगडाला भेट; झेडपीच्या कर्मचाऱ्यांकडून महाश्रमदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादित नामांकनाच्या यादीत समावेशासाठी एक पथक राज्यातील किल्ल्यांची पाहणी करणार आहे. यामध्ये प्रतापगडचा ही समावेश आहे. प्रतापगडाच्या पाहणीसाठी हे पथक लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे गटविकास अधिकारी अरुण मरबळ, सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव कांबळे, कुंभरोशी सरपंच कांचन सावंत, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे उपस्थित होते. दरम्यान, यांच्यासह ग्रामस्थ, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, य़ुवक मंडळे, हिलदरी संस्था, गाईड संघटना व हाॅटेल संघटना संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कुंभरोशी यांच्या वतीने किल्ल्याचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.

प्रतापगडावर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. यामुळे गडावर पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक, कागद यांचा मोठा कचरा दिसून येतो. यामुळे सातारा जिल्हा परिषदेने महाबळेश्वर तालुक्यातील सर्वांच्या वतीने महाश्रमदानाचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, गाईड, पंचक्रोशीतील बचत गटाच्या महिला, पंचायत समितीचे कर्मचारी, शिक्षक, अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या श्रमदानातून पाच कि.मी.चा तटबंदी लगतचा मार्ग स्वच्छ करण्यात आला.