कराड प्रतिनिधी । “ज्या सफाई कामगारांच्या सेवा न्यायालयीन आदेशान्वये किंवा अन्य निर्णयान्वये नियमित झाल्या आहेत, त्यांना शासन निर्णयाद्वारे लाड समितीच्या शिफारसी लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कराड नगरपरिषदेत रिक्त झालेल्या पदावर लाड शिफारशी व अनुकंपानुसार वारसांना तात्काळ नियुक्ती द्यावी, अन्यथा सोमवार, दि. 30 सप्टेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल भोसले, उपाध्यक्ष सदाशिव महापुरे, सचिव अनिल गवळी यांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
कराड नगर पालिकेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने, कराड पालिका प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड नगरपरिषदेतील रोजंदारी फिक्स मस्टरवर ७८ कर्मचारी आरोग्य व ड्रेनेज विभागात नगरपालिकेकडे काम करत आहेत. त्यापैकी ५१ रिक्त पदांवर वेगवेगळी रिक्त पदे होती, त्या पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. परंतु नगरपरिषदेमध्ये सफाई कामगार पद शिल्लक नसल्याने त्याना बाग मजूर, बाग माळी, वॉटर वर्क्स मजूर इत्यादी पदावर नगरपालीकेच्या सोयीनुसार नियुक्ती दिली. परंतु हे सर्व कर्मचारी सफाई कामगार म्हणून काम करत होते व करत आहेत. त्यानंतर उर्वरीत ६२ रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून ६२ पदास पदनिर्मितीस नगरपरिषद प्रशासन सचालनालय, मुंबई या विभागाकडून मान्यता घेवून त्यांना वेगवेगळया पदावर सामावून घेतले.
ज्या सफाई कामगारांच्या सेवा न्यायालयीन आदेशान्वये किंवा अन्य निर्णयान्वये नियमित झाल्या आहेत, त्यांना या शासन निर्णयाद्वारे वरीलप्रमाणे लाड समितीच्या शिफारसी लागू करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रवर्गतील एखादया कामगाराचे पदनाम काहीही असले तरी त्या कामगारास जर उपरोक्त सफाई कामगार या व्याख्येत बसणारे काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार म्हणून संबोधण्यात यावे व त्यांना सफाई कामगाराचे सर्व लाभ देणेबाबत सुचित केले आहे. या शासन निर्णयाच्या अमलबजावणीसंदर्भात शक्यतोवर संबंधित नियुक्त प्राधिकारी तथा संबंधित शासकीय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरच निर्णय घ्यांवा.
यापूर्वी आम्ही शासन स्तरावर सतत पाठपुरावा करत होतो, आमच्या वारसाना लाड शिफारशी व अनुकंपा लागू करणेस टाळाटाळ केली जात होती व आहे. तरीसुध्दा आम्ही शाततेची भूमिका घेतली होती. सदर औरंगाबाद खंडपिठाचा आदेश व दि. २४ फेब्रुवारी २०२३ रोजीचा जी आर नुसार आपले नगरपरिषदेतील ७८ सफाई कर्मचारी पात्र असूनसुध्दा त्याना सतत टाळटाळ केली जात आहे, तरी त्यांच्या नेमणुका त्वरीत कराव्यात. तसेच महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचनालय मुंबई याचेकडील दि. ३० जुलै २०२४ चे आदेशानुसार जे कर्मचारी मयत अथवा सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर लाड शिफारशी व अनुकंपानुसार वारसांना तात्काळ नियुक्ती देणेत यावी. जर वरील आदेशानुसार कारवाई न केल्यास दिनांक 30 सप्टेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण करणार असलचेही या निवेदनात म्हंटले आहे.