डेमू पॅसेंजर रेल्वेच्या अंधाऱ्या डब्यांतून प्रवाशांनी केला प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोल्हापूर ते सांगली दरम्यान मार्गावर डेमू पॅसेंजर रेल्वे ही सद्या सोडली जात आहे. मात्र, या डेमू रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी सायंकाळी पॅसेंजरमधील दिवे बंद पडल्याने प्रवाशांना अंधाऱ्या डब्यांतून प्रवास करावा लागला. यावेळी संतापलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांनी धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी खटपट करुन डब्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत केला.

सातारा ते कोल्हापूर – सातारा दरम्यान सकाळी व सायंकाळी पॅसेंजर रेल्वे जाते. या पॅसेंजर डेमूच्या डब्यांमध्ये अस्वच्छता, गाडी विलंबाने धावणे आदी समस्यांना प्रवाशांना दररोज समोर जावे लागते. गेल्या काही महिन्यांत डेमू गाडीच्या नादुरुस्त्यांमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता कोल्हापुरातून सुटलेली सांगली पॅसेंजर रुकडीमध्ये येताच अंधारात बुडून गेली. डब्यांतील वीजपुरवठा अचानक बंद झाला. सर्व दिवे आणि पंखे बंद पडले. प्रवाशांनी मोबाईलच्या बॅटऱ्या सुरु करुन उजेडाचा प्रयत्न केला. यादरम्यान, महिला प्रवाशांना चोरीमारीपासून सावध राहण्याची वेळ आली.

पुढील स्थानकात दिवे सुरु होतील या अपेक्षेने प्रवासी शांत होते, पण प्रशासनाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. अंधार पडलेले डबे तसेच धावत राहिले. हातकणंगले स्थानकात कोयना एक्सप्रेसच्या क्रॉसिंगसाठी डेमू थांबली. त्यावेळी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी अधीक्षकांना धारेवर धरले. त्यानंतर रेल्वे कर्मचारी पाठवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

सातारा-कोल्हापूर पॅंसेंजर हजारो प्रवाशांसाठी महत्वाची…

लाल डेमूचे इंजिन सतत नादुरुस्त होते. सकाळी धावणारी सातारा – कोल्हापूर पॅंसेंजर हजारो प्रवाशांसाठी महत्वाची आहे. सातारा, सांगली, मिरज, जयसिंगपुरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नोकरदार कोल्हापूरला जातात. ही गाडी सकाळी ९.५० वाजता कोल्हापुरात पोहोचण्याची वेळ आहे. पण इंजिनातील बिघाडामुळे सातत्याने विलंबाने धावते. पंधरवड्यापूर्वी तर चक्क बारा वाजता पोहोचली होती. बिघाडामुळे तिची गती मंदावली होती. ताशी २०-३० किलोमीटर या गडीने डेमू धावत होती. या गाडीने प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली.

भाडे वाढवले तरी चालेल पण सेवा चांगली द्या…

रेल्वेने कोरोनाकाळात वाढवलेले तिकीटांचे दर नुकतेच पूर्ववत केले. मिरज ते कोल्हापूर हे ३० रुपये प्रवासभाडे पुन्हा १५ रुपयांवर आणले. रेल्वेने प्रसंगी भाडे वाढवले तरी चालेल, पण सेवा चांगली द्यावी, अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे.