सातारा जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 611 शाळांचे वीज कनेक्शन होणार कट

0
179
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांची थकीत वीजबिले शाळांनी भरायची की ग्रामपंचायतींच्या १५ व्या वित्त आयोगातून भरायची या गोंधळात झेडपी शाळांचे तब्बल ५० लाखांहून अधिक वीजबिल थकीत असल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्ह्यातील १ हजार ६११ शाळांचे मागील काही महिन्यांचे बिल भरले नाही. यावर मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वीजबिले न भरल्यास वीज बंद करण्याचा इशारा महावितरण विभागाने दिला आहे.

जिल्ह्यातील शाळांचे वीजबिल न भरल्याने गेल्या वर्षी महावितरण विभागाने कारवाईची मोहीम राबवीत काही शाळांची वीज तोडली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत यावर तोडगा काढण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा शाळांची थकीत बिले मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.

मागील काही वर्षांत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांची वीजबिले ग्रामपंचायतींच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयाची तात्पुरती अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शाळांची बिले भरण्याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.