कराड प्रतिनिधी | कराड येथील कृष्णा नाक्यावर आज मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भीषण आगीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड येथील कृष्णा नाका येथे एकजण आपली इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन थांबले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक स्कूटरमधून धूर येऊ लागला. संबंधित वाहनचालकाने तत्काळ स्कूटर रस्त्याकडेला लावून लांब जाऊन थांबले. तसेच आगीबाबत परिसरातील नागरिकांना याची माहिती दिली. अचानक दुचाकीने पेट घेतल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
परिसरातील नागरिकांनी तत्काळ याची माहिती कराड पालिकेच्या अग्निशमन दलास दिली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती.