राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे निवडणुक विषयक प्रशिक्षण संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काल दि. 23 फेब्रुवारी रोजी राजकीय पक्षांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी आदर्श आचार संहिता एक खिडकी यंत्रणा, सीव्हिजील, नामनिर्देशन प्रक्रिया, मतदार नोंदणी ईईएम, ईएस एम एस, पेड न्युज, माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण आदि विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षण नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पार पडले असून या प्रशिक्षणास राजकीय पक्ष सदस्य उपस्थित होते.

निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन कशापध्दतीने करावे, Singal Window System, CVIGIL याबाबतचे प्रशिक्षण मनोहर गव्हाड, जि.का.सातारा यांनी दिले. त्यांनी निवडणूक प्रचारार्थ घ्यावयाच्या सर्व परवानग्या व खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सभा, रॅली, पक्ष कार्यालये यांच्या परवानगीकरिता राबविण्यात येणा-या एक खिडकी योजनेबाबत कल्पना दिली. उपस्थित राजकीय पक्ष प्रतिनिधी यांनी एक खिडकी योजनेच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, अर्जाची छाननी प्रक्रिया, उमेदवारी मागे घेणे, चिन्ह वाटप, Criminal Anticidents, Voter Registration, Conduct of Election या विषयाचे प्रशिक्षण सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी,सातारा यांनी दिले. उमेदवारांनी आपल्या फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र सादर करणे व प्रसिध्द करणे याबाबतची सविस्तर माहिती दिली.

तसेच पेड न्युज , राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, त्यासंबंधी अर्ज करण्याची प्रक्रिया, अपिल प्रक्रिया, सोशल मिडीया संनियंत्रण आदी विषयाचे प्रशिक्षण वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी, सातारा यांनी दिले. राहूल कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प.सातारा यांनी निवडणूक खर्च संनियत्रंण कामकाज विषयक मार्गदर्शन केले. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवार यांचेकडून केल्या जाणा-या खर्च विषयक कायदेशीर तरतूदीची व त्यांनी ठेवावयाच्या दैनंदिन लेख्यांबाबत माहिती दिली.

सदर प्रशिक्षणास विविध राजकीय पक्षाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाचे नियोजन विजया यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण व्यवस्थापन यांनी केले. तसेच जीवन गलांडे, अपर जिल्हाधिकारी, जि.का.सातारा हे ही सदर प्रशिक्षणास उपस्थित होते. त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता बाबत मार्गदर्शन केले तसेच राजकीय पक्ष प्रतिनिधी यांच्या विविध शंकाना समर्पक उत्तरे देवून निराकरण केले. तसेच सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक कार्यक्रम शांततेत व आयोगाच्या निर्देशानुसार पार पडणेसाठी आवश्यक सहकार्य करण्याबाबत आवाहन केले.