निवडणूक प्रक्रियेमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जात असल्याने निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक : भगवान कांबळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ईव्हीएम मशीन हॅक करून राजकीय पक्षांना सत्तेवर बसवले जात असून आमच्या मुलभूत हक्कावर गदा आणण्याचा डाव असल्याबाबत ओबीसी जिल्हाधक्ष भरत लोकरे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे निवेदन प्राप्त झाले होते. तसेच यापुढील निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यावर सातारा उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी खुलासा केला आहे. मतदारांना आपण केलेले मतदान हे दुसऱ्या कोणासही गेले नाही याची खात्री व्हावी यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असणारी निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक व निःपक्षपाती असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.

भारतात सद्यस्थितीत लोकसभा व विधानसभा निवडणुककामी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅटचा वापर करणेत येत आहे. निवडणूक काळात जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार भारत निवडणुक आयोगाकडून या मशीन्स पुरविले जातात. या मशीन्स जिल्ह्यांना प्राप्त झाल्यानंतर सदर मशिन्सची मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे अध्यक्ष/प्रतिनिधी, BEL इंजिनियर यांचे उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी केली जाते. त्यानंतर या मशिन्स जिल्ह्याच्या ठिकाणी असणा-या सुरक्षा कक्षामध्ये ठेवण्यात येतात. सदर सुरक्षाकक्ष बंदिस्त स्वरूपात असून हत्यारबंद सुरक्षारक्षक, डबल लॉक सिस्टीम, सीसीटीव्ही, अग्नीरोधक यंत्रणा, इत्यादी बाबींनी सुसज्ज आहे. याची जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांचेमार्फत त्याची नियमितपणे राजकीय प्रतिनिधीच्या उपस्थितीत तपासणी केली जाते.

प्रत्यक्ष निवडणुकवेळी प्रत्येक मतदान केंद्रावर जाणाऱ्या मशिन्सबाबत संपूर्ण गोपनीयता बाळगली जाते. सदर मशिन्स या सरमिसळ पद्धतीचा वापर केला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया ही जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचेमार्फत मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे अध्यक्ष/प्रतिनिधी यांचे उपस्थितीत पार पाडणेत येते.

निवडणूक कामी वापरण्यात येणा-या कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन्स ह्या ड्राय बॅटरीवर चालत असून प्रत्येक मशिनला वेगळा युनिक क्रमांक दिलेले असतात. या मशीन्सशी कोणत्याही विद्युत लहरीतून अथवा बाह्य उपकरणाद्वारे संपर्क साधता येत नाही. सदर मशीन्समध्ये असणारी डेटा चीपमध्ये कोणी हेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास अनऑथोराईज्ड अॅक्सेस डिटेक्शन मॉडेल कार्यान्वित होऊन पूर्ण मशीन्स डिसेबल होते, असेही कांबळे यांनी म्हटले आहे.