कराड प्रतिनिधी । आचारसंहितेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वप्रथम सर्वांनी काळजी घ्यावी. दरम्यान मतदान केंद्रावर कोणतीही गैरसोय होणार नाही याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचारी यांची असेल आदी निर्देश कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज पोलीस पाटील व ग्रामसेवक, तलाठी यांना दिले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत २५९ कराड उत्तर व २६० कराड दक्षिण मतदार संघातील पोलीस पाटील, ग्रामसेवक व तलाठी यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयातील बैठक हॉलमध्ये आज पार पडली. या बैठकीस कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आचारसंहिता सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, कराड दक्षिणच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, कराड उत्तर च्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक राजू तासीलदार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. पवार उपस्थित होते.
म्हेत्रे म्हणाले, मतदान केंद्रावर केंद्र क्रमांक लिहला आहे का ? पुरेसे फर्निचर, लाईट, पाणी, प्रसाधनगृह, आवश्यक त्या ठिकाणी मंडप ची सोय असे सर्वसोयीनीयुक्त सज्ज केंद्र दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावे. पिण्यासाठी जार चे पाणी, १९ व २० ता. ला टीमला पुरविण्यात यावे. साहित्य देव-देव साठी ज्या ग्रामसेवकांची नेमणूक आहे त्यांनी या कामाबरोबरच स्वतःच्या गावातही जबाबदारी पार पाडायची आहे. शासकीय व जीपीएस यंत्रणा असलेल्या बसमधून व पोलीस कर्मचारी बरोबर असेल तरच मतदान केंद्रे जातील व येतील.
टीम केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना केंद्रावर कर्तव्यास नेमलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला परिचय द्यावा. दोन वेळचे जेवण, एक नाश्ता व तीन वेळचा चहा याबाबत त्या गावातील बचतगट अथवा तत्सम यंत्रणा जोडून द्यावी. तसेच कराड उत्तरमधील मसूर, सुर्ली, नागठाणे व तळबीड आणि कराड दक्षिण मधील ओंड, वडगाव (ह) कोळे व चचेगाव येथील आठवडी बाजार २० तारखेला बंद राहतील. मतदान केंद्र परिसरात २०० मीटरच्या अंतरानजीक मतदानादिवशी यात्रा, उरूस, भजन, कीर्तन, प्रवचन ठेवता येणार नाही.
आचारसंहिता लक्षात घेऊन दि. १८ तारखेला सायंकाळी ६ वाजता प्रचार, प्रसार बंद होऊन बॅनर, पोस्टर निघतील. सर्वांनी त्यासाठी नि:पक्षपाती कामकाज करावे. मतदार स्लिप बीएलओ मार्फत १५ तारखेपासून वाटण्यात येतील. मतदान केंद्रे ७० % वेबकास्ट केलेले आहेत. त्यामुळे कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद होत आहे याची दक्षता घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट आशा सेविका यांच्याकडे देण्यात येईल. १०० मीटरच्या आत मोबाईल घेऊन कोणीही प्रवेश करणार नाही, असे सांगून शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन म्हेत्रे यांनी यावेळी केले.
सकाळच्या सत्रात चतुर्थश्रेणी (शिपाई) कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
दरम्यान, आज सकाळच्या सत्रात चतुर्थश्रेणी (शिपाई) कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणास मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी म्हेत्रे म्हणाले, आपण दोन दिवस अगोदरच मतदान केंद्रांची चावी ताब्यात घ्यावी. त्यानंतर फर्निचर, लाईट, पाणी, पुरेसे आहे का ते पहावे, नसेल तर उपलब्ध करावे. दिनांक १८ पर्यंत मतदान केंद्रांची व परिसराची स्वच्छता करावी. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय जार ने करावी. स्वतःची ओळखपत्र घ्यावे. स्थानिक बचतगट किंवा तत्सव यंत्रणेकडून टीमची भोजन व्यवस्था करावी. मतदान केंद्रावरील सर्व कामकाजास मदत करावी. केंद्रावर पोलीस कर्मचारी आहे का पहावे. १०० व २०० मीटरवर सीमारेषा आखावी. मतदान केंद्रावरील साहित्य घेऊन जाणे व जमा करणे करिता टीमसोबत रहावे. मतदारांची बैठक व्यवस्था करावी व केंद्राबाहेर लाईटची पुरेशी व्यवस्था करावी अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी म्हेत्रे यांनी दिल्या.
बैठकीत या महत्वाच्या गोष्टीवर चर्चा
१) मतदानादिवशी आठवडा बाजार बंद राहणार
२) मतदान केंद्रावर वीज, जार चे पाणी, स्वच्छतागृह, आवश्यक तेथे उन्हासाठी मंडप.
३) १०० मीटरच्या आत मोबाईल बंदी
४) ७० टक्के केंद्र वेबकास्टिंग ने जोडली जाणार
५) मतदान केंद्रावर गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामसेवक त्यांच्याच कामाच्या गावी असतील
६) निवडणूक शांततेत पार पाडावी. कुठे गैरसोय झाल्यास अथवा अनुचित प्रकार घडल्यास गंभीर दखल घेतली जाणार
७) मतदान केंद्रावर १२ पुराव्यापैकी एक मूळ पुरावा (कागद) घेऊनच मतदानास यावे. मोबाईलमधीलपुरावा ग्राह्य धरला जाणार नाही.
८) दिव्यांग व ८० वर्षावरील वयोवृद्धांसाठी शासनाची रीक्षा असणार
९) चिन्ह असलेली चिट्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार