सातारा प्रतिनिधी | सातजन्माच्या शपथा घेऊन दोघांनी आयुष्यभर आपली साथ सोडली नाही. प्रत्येक संकट आणि आव्हाने पेलत एकमेकांना आधार, धीर दिला आणि शेवटी दोघांनी एकाचवेळी आपले आयुष्य संपवले. सातारा येथे आज बुधवारी दुपारी र्हदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. येथील शुक्रवार पेठेतील एका वृद्ध दाम्पत्याने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. उत्तमराव भाऊसाहेब शिंदे (वय ८६), प्रभावती उत्तमराव शिंदे (७५) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उत्तमराव शिंदे यांचे पोवई नाक्यावर छोटंसं दुकान आहे. या दुकानात ते नेहमी जायचे. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून ते दुकानात गेले नाहीत. दरम्यान, आज बुधवारी दुपारी घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे तातडीने कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले. खिडकीतून हात घालून पोलिसांनी दरवाजा उघडला. त्यावेळी उत्तमराव शिंदे आणि प्रभावती शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यांच्या मृतदेहाशेजारीच विषारी औषधाची बाटली पोलिसांना सापडली. ४ दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघेच घरात राहत होते. प्रभावती यांना वयोमानामुळे स्वयंपाक करता येत नसल्यामुळे बाहेरहून ते रोज जेवणाचा डबा आणत होते. त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप पुढे आले नाही. त्यांना दोन मुले असून, ही मुले शहरातच वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.