सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी काल रात्री आले होते. आज मुंबईकडे जात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री निवडीच्या चर्चेवरून महाविकास आघाडीला टोला लगावला. “महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन वादविवाद सुरु आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचा उमेदवार ठरविण्यापेक्षा विरोधीपक्षनेते पदाचा उमेदवार ठरविणे गरजेचे आहे. कारण आघाडीतील नेत्यांच्या तंगड्यात त्यांच्याच गळ्यात अडकणार आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले.
साताऱ्यातील दरे गावी अत्यंत गोपनीय दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, आमची जी काही महायुती आहे. या महायुतीत कोणतीही स्पर्धा नाही आणि मी तर स्वत:ला मुख्यमंत्री न मानता सर्वांना उपलब्ध असलेला कॉमन मॅन समजतो. आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. गेल्या दोन सव्वा दोन वर्षात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे झाली आहेत. याची पोच पावती जनता मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले.
कुठे कोणते उमेदवार द्यायचे हे दोन दिवसात ठरेल…
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जागा वाटपाबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, राज्यात कुठेही बंडखोरी होणार नाही महायुती समन्वयाने लढेल. कोण उभे राहते हे महत्त्वाचे नाही तर शेवटी जिंकणं महत्त्वाचं आहे, कोणाला किती जागा द्यायच्या व कुठे कोणते उमेदवार द्यायचे हे आज दोन दिवसात ठरेल.
महाविकास आघाडीत लवकरच बिघाडी
महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. ती विचार सोडलेली आघाडी आहे. बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या आघाडीत लवकरच बिघाडी होईल असे मतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.