सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी तीन दिवस मुक्कामी असून त्यांनी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी अग्रवाल यांच्या महाबळेश्वरमधील बेकायदेशीर हॉटेलबाबत प्रतिक्रिया दिली. अग्रवाल याचे बेकायदेशीर हॉटेल असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल याच्या कुटुंबाने जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधलं असेल तर त्यावर बुलडोझर फिरवावा. अशा कारवाईच्या सूचना पोलीस, पालिका प्रशासनास दिल्या आहेत.
अग्रवाल अन् महाबळेश्वर कनेक्शन नेमकं आहे काय?
पुण्यातील कल्याणी नगर या ठिकाणी अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत पोर्श कार चालवत एका दुचाकीला उडवलं होतं. यात दोघांचा मृत्यु झाल्यानंतर राज्यात आणि देशात एकच खळबळ उडाली. या सर्व प्रकरणानंतर अग्रवाल कुटुंबानं हे प्रकरण दाबण्यासाठी अनेक ठिकाणी दबाव तयार केला होता. मात्र या प्रकरणी अग्रवाल कुटुंबातील एकूण तिघांना अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलाचे अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांना सुद्धा अटक झाली आणि नंतर सुरेंद्र अग्रवाल यांना सुद्धा अटक झाली. आता विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन उघड झाले आहे.
पालिकेत तक्रार दाखल…
महाबळेश्वरमध्ये अग्रवाल यांनी शासकीय मिळकत भाड्यानं घेवून या ठिकाणी फाईव्हस्टार दर्जाचं पंचातारांकित हॉटेल बांधलं आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून हे हॉटेल उभारण्यात आल्याचं निदर्शनात येत आहे. या बाबत महाबळेश्वर नगरपालिकेत तक्रारी दाखल करण्यात आली असून यावर अजूनही कारवाई झाली नाही.