मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मी माझा निर्णय घेतलायं…मी कॉमन मॅन”…”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यात त्यांच्या दरे गावी तीन दिवसाचा मुक्काम केल्यानंतर ठाण्याकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ता स्थापनेचा पेच आणि मुख्यमंत्रीपदाबाबत असलेली चर्चा यावर भूमिका स्पष्ट केली. “मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्ष मी कॉमन मॅन म्हणून मी काम केले. जनतेचे प्रश्न सोडवले. अनेक योजना आणल्या. त्याचा फायदा राज्यातील कोट्यवधी लोकांना मिळत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री होते. आम्हाला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर कोणताही संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यात मी पत्रकार परिषद घेतली. त्यात माझी सर्व भूमिका स्पष्ट केली. मी माझा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरे येथील निवासस्थानी आज एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी जे काही दोन दिवसासाठी गावाकडे आलो. आणि उपचार घेतले. कारण माझी तब्बेत ठीक नव्हती. आता माझी तब्येत ठीक आहे. आरामासाठी मी गावी आलो होतो. अडीच वर्षात मी सुट्टी घेतली नाही. निवडणूक काळातही खूप कष्ट घेतले. त्यामुळे थोडा आराम करण्यासाठी मी गावाला आलो होतो,”

यावेळी शिंदे यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “विरोधकांना विरोधी पक्षनेताही करता येत नाही. त्यामुळं ईव्हीएम विषय बाहेर काढत आहेत. लोकसभा निवडणूक, झारखंड, तेलंगाणा, कर्नाटकमध्येही विरोधकांना यश मिळालं. त्यावेळी त्यांनी ईव्हीएमवर सवाल का नाही उपस्थित केले? त्यामुळं आता विरोधकांना काही काम राहिलं नाही. त्यांनी थांबवलेले कामं आम्ही पूर्ण केली आहेत.

जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होणार

“कोण मुख्यमंत्री होणार? अर्थमंत्रिपद तसंच गृहमंत्रिपद पाहिजे या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्यासोबत झाली होती. आता महायुतीच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. यात राज्याच्या हिताचा निर्णय होणार आहे. जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत. आमच्यात काहीच वाद नाही. सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहेत. जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होणार आहे. जनतेनं आम्हाला भरभरून दिलं,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.