ठाकरे गटाच्या हातून सगळं गेलंय तेलही अन् तूपही गेलंय; एकनाथ शिंदे यांची संजय राऊतांवर टीका

0
3

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील राजकीय धोरणात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल होत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाची स्थिती अधिकच बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव सेना) चे खासदार संजय राऊत यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊतांना आता या गोष्टीची आठवण झाली का?, बैल गेला आणि झोपा केला, असे आहे की काय? ठाकरे गटाच्या हातून सगळे गेले आहे. तेलही गेले आणि तूपही गेले,” अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, “२०१९ मध्ये जनतेने युतीला स्पष्ट कौल दिला होता, परंतु स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. आता तेच म्हणायला लागले आहेत की, बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना स्मारकाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देणार नाही. बाळासाहेब कोणा एकट्या दुकट्याचे नाहीत, ते लोकनेते होते.” यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला, “आता बोलून त्याचा काही उपयोग आहे का?” त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या संदर्भातही बोलताना सांगितले, “अमित शाह शिर्डीला आले होते, त्यांचे भाषण तुम्ही ऐका.”

दरम्यान, राज्यभरातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवक उद्धव सेनेला सोडून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. या गळतीच्या पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांनी ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली होती. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

संतोष देशमुख प्रकरण हे अतिशय दुर्दैवी; उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “संतोष देशमुख प्रकरण हे अतिशय दुर्दैवी आहे, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अतिशय निर्घृणपणे हत्या झाली आहे. शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सीआयडी आणि एसआयटी लावलेली आहे. यातील एकही आरोपी सुटणार नाहीत. कोणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणाला पाठीशी घालणार नाही. आरोपींना फाशी सारखी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली जाणार आहे. फास्टट्रॅकवर हा खटला चालवला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.