सातारा प्रतिनिधी । काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्या कारणाने ते सध्या आपल्या साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. त्यांच्या शरीराचे तापमान 105 डिग्री असल्याने त्यांच्यावर चार डॉक्टरांच्या पथकाकडून काल त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल विश्रांती घेतली. दोन दिवस विश्रांतीनंतर आज दुपारी व वाजता शिंदे त्यांच्या खासगी हेलीकॉप्टरने ठाण्याला परतणार आहेत. दरम्यान, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. परंतु आजारी असल्यामुळे एकनाथ शिंदेंकडून कार्यकर्त्यांची भेट नाकारण्यात आली.
एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. असून सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे काल दिवसभर एकनाथ शिंदे यांनी आराम केला. त्यानंतर आज एकनाथ शिंदे ठाण्याला परतणार आहेत. एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाल्यानंतर ते विविध बैठकीत सहभागी होणार की नाही आणि महायुतीकडून पुढे कोणती पावलं उचलली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
डॉ. पार्टे यांनी शिंदेंच्या उपचारांबाबत दिली महत्वाची माहिती
काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. पार्टे यांनी शनिवारी रात्री माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना ताप येत आहे, सर्दी आहे, घशाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू केले आहेत. सलाइन लावले आहे. आयव्ही लावला आहे. त्यांना एक दोन दिवसांत बरे वाटले याची खात्री आहे. कालपासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. आता प्रकृती चांगली आहे. आता आमच्याशी गप्पा मारत होते.
दीपक केसरकर माघारी गेले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्या कारणाने त्यांना भेटण्यासाठीच शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर आणि जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील हे काल दरे गावी आले होते. मात्र, शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. त्यानंतर दीपक केसरकर मुंबईकडे रवाना झाले. शिंदे यांनी कोणालाही भेटू नये असा सुचणंडॉक्टरांनी केलेल्या आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबरला
विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.