कराड प्रतिनिधी | सातारा – दोन वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला, त्या उठावामध्ये शंभूराज देसाई हे दोन पावलं पुढं होते. म्हणून त्यांना दोन जिल्ह्याचं पालकमंत्री केलं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबवे (ता. कराड) येथील जाहीर प्रचार सभेत केलं. तसेच या निवडणुकीत त्यांच्या समोर विरोधक कोणीही असू दे, शंभूराजेच गड सर करणार, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आमच्या इच्छे विरूद्ध कॉंग्रेसशी घरोबा
पाटण विधानसभा मतदार संघातील शंभूराज देसाईच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, २०१९ च्या निवडणूक निकालानंतर आमच्या इच्छेविरूध्द उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत घरोबा केला. त्यामुळे आम्ही उठावाचं पाऊल उचललं. त्यावेळी शंभूराज देसाई दोन पावलं पुढं होते.
सावज टप्प्यात येताच करेक्ट कार्यक्रम झाला
उठावापूर्वी शंभूराज विचारायचे की, कधी करायचा.. कधी करायचा. त्यांना मी सांगितलं की, करेक्ट कार्यक्रम करायला वेळ साधायची असते. सावज टप्प्यात यावं लागतं. ते टप्प्यात आलं आणि करेक्ट कार्यक्रम झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उठावावर भाष्य केलं. मागील अडीच वर्षात आम्ही पक्ष वाढवला. उबाठापेक्षा ७ टक्क्याने आपण पुढे आहोत. बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहेत. खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांचे विचार आणि जनतेच्या भावना पायदळी तुडवणार नाही, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जायला तयार
लाडक्या बहिणींना पैसे दिले तर तुमच्या पोटात का दुखतंय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला. ही योजना बंद व्हावी म्हणून मविआचे नेते उच्च न्यायालयात गेले. सरकार आल्यावर चौकशी लावून दोषींना जेलमध्ये टाकू म्हणाले. हा एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींसाठी शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा. विरोधकांच्या खोट्या प्रचारापासून सावध राहा. विरोधकांना चारीमुंड्या चित करा. असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.