सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी कोरेगावात महायुतीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. जनतेने मागील विधानसभा निवडणुकीत तसा कौल दिला होता. मात्र, काही लोकांनी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले. बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी गहाण ठेवले होते ते आम्ही अभिमानाने सोडवले, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाच्या महेश शिंदे यांच्यात लढत होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत महेश शिंदेंनी विजय मिळवून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा फगवा फडकवला होता.
यावेळी शिंदे म्हंटले कि, आम्ही दोन वर्षांपूर्वी जो उठाव केला त्यामध्ये सर्वात पुढे महेश शिंदे होते. अन्यायाविरुद्ध पेटून उठा. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळेजण तयार झाले आणि तत्कालीन सरकार पाडण्याचे काम आम्ही केले. शिवसेना-भाजपा युतीचे सरकार यायला हवे ही जनतेची इच्छा होती.
“महेश माझ्या विश्वासातील बॅट्समन आहे, तो चौकार आणि षटकार मारुन सेंच्युरी मारल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. त्याच्या प्रचाराला येण्याची गरज नव्हती. पण, मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा असल्याने मी इथे आलोय. माझ्या जन्मभूमीत सभा होतायत याचा अभिमान वाटतो. कोरोना काळात महेश शिंदेने अप्रतिम काम केले. तो माझा सर्वात आवडता आमदार आहे. त्याला निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे, त्यानंतर तुमच्या मनात असलेली इच्छा मी पूर्ण करेन”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महेश शिंदे यांना आगामी काळात मोठे पद देणार असल्याचे संकेत दिले.