सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पॅराग्लायडिंग साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच्या पारितोषिक वितरणास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. माझ्यावर हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा मुख्यमंत्री अशी टीका करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करत फिरण्यापेक्षा शेतात जाऊन शेती करणे कितीही चांगले आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी आज मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्रीपदाची हवा गेली नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाचगणी येथील एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या टीकेला देखील उत्तर दिले. “मी माझा वेळ वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतो. त्या वाचवलेल्या वेळेत मी शेतकऱ्यांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतो त्यांचे प्रश्न मार्गी लावतो. हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरू नये असा काय कायदा आहे काय? मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमचं सरकार हे शेतकऱ्यांच सरकार आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सर्व नियम बाजूला ठेवतो.”
“भिवंडीत एक दुधवाला आहे तोही एक शेतकरी असून त्याची शेती आहे. त्याने देखील स्वतः हेलिकॉप्टर घेतलं आहे. मी तर सरकारी हेलिकॉप्टरमधून फिरत आहे. आणि आमच्या शेतकऱयांनी हेलिकॉप्टरमधून फिरू नये का? बिनधास्त फिरावे कुणाची काही बंदी आहे का? मी वेळेची बचत करण्यासाठी हेलिकॉप्टरने शेतात जातो. मी शेतात अनेक पिके घेतली आहेत. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात,” असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले.
मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला pic.twitter.com/lLzoUCQani
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 18, 2024
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
26 नोव्हेंबर 2022 रोजी उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यातील चिखलीमध्ये शेतकरी संवाद मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांची खिल्ली उडवली होती. त्यावेळी ठाकरे म्हणाले होते की, “देशात दुसरा हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा. हेलिकॉप्टर शेतात उतरतं. आणि तुम्ही शेतात पायी जाताना. दिवसा वीज असते की नसते? मग रात्रीचं जाता?”, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारले. “हा आमचा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझं त्यांच्या सुबत्तेबद्दल काही म्हणणं नाही. पण महाराष्ट्रातील शेतकरी असा कधी होणार? हा सवाल आहे,” असे ठाकरे यांनी म्हंटले होते.
स्ट्रॉबेरी पिकासाठी अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील : CM शिंदे
महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व येथील आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार
पॅराग्लायडींग करणे हे साहसी व आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणे तितकेच महत्त्वाचे आहे. दऱ्या खोऱ्यांनी व निसर्गसंपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचे चांगले आयोजन केले आहे.पॅराग्लायडींग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले.