बाळासाहेबांच्या वेशभूषेवरून मुख्यमंत्री शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी अयोध्येत न जाता शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या लूकमध्ये दिसून आले. मात्र, आता त्यांच्या या लुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून त्यांच्यासारखे होता येत नाही. त्यासाठी मनात बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. ते विचार त्यांनी सोडले आहेत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावातील उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा लुक संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, लांडग्यांनी वाघाचं कातडं पांघरल म्हणजे लांडगा वाघ होत नाही. यासाठी वाघाचं काळीज लागतं. खरं तर वाघ एकच आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. माझी शिवसेना काँग्रेस होईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन म्हणणाऱ्या बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि स्वार्थासाठी त्यागले आहेत. त्यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसले आहे. त्यामुळे मिंधेपणा कोणी केला याचा विचार जनतेने केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मोदींना साष्टांग दंडवत घालायला पाहिजे होतं, पण ते काँग्रेसला घालायला लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच मी काल पण हेच बोललो आहे की, पब्लिक सब जानती है! काल त्यांनी माझ्यावर टीका केली, मोदींवर टीका केली. पण त्यांना आमच्यावर टीका करण्याचा काय अधिकार आहे? ज्या मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. काश्मीरमधून 370 कलम हटवले, असे म्हणत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.