सातारा प्रतिनिधी | योजना फसवी आहे, चुनावी जुमला आहे, पैसे येणारच नाहीत, अशी टीका करत सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरली. त्यांची थोबाडं पांढरी फटक झाली असल्याचा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. या योजनेमुळं वेडे झालेल्या विरोधकांना सातारी कंदी पेढे पाठवा, असं मिश्किल आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
आपली बहीण लाडकी, विरोधकांच्या छातीत धडकी
साताऱ्यातील लाडकी बहीण सन्मान सोहळ्यात शिंदे-फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला. आपली बहीण लाडकी, ‘विरोधकांच्या छातीत भरली धडकी’, असे म्हणत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुपरडुपर हिट झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तीन दिवसात १ कोटी महिलांना ३ हजार कोटींचे वाटप झाले आहे. आपल्यासाठी पूर्ण अर्थिक वर्षामध्ये ३५ हजार कोटींची तरतूद ठेवलेली असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिली.
बहिणींनी ताकद दिल्यास दीड हजाराचे तीन हजारही होतील
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दीड हजार रूपयाने ही योजना सुरू केलीय. पुढे सरकारची ताकद वाढली तर दीड हजाराचे तीन हजारही होतील. त्यापेक्षाही जास्त देण्याची आमची दानत आहे. आपण जेवढी ताकद द्याल, तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यात पैसे टाकण्याचे काम केल्याशिवाय राहणार नाही. दीड हजार रूपये देवून आम्हाला थांबायचे नाही, असं मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना सांगितलं.
तुम्ही टेन्शन घेऊ नका, सावत्र भावांना टेन्शन द्या
कपटी भावांपासून सावध राहण्याचा सल्ला देतानाच ‘तुम्ही टेन्शन घेवू नका, सावत्र भावांना टेन्शन द्या’, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ही योजना बंद होणारी नाही. त्याची पूर्ण तरतूद केलेली आहे. अर्थिक परिस्थिती बदलत जाईल, तसतसे सरकार आपल्यासाठी आणखी योजना आणेल. इथे देना बँक आहे, लेना बँक नाही. लाडक्या बहिणींसाठी हा माहेरचा आहेर आहे आणि हे सरकार बहिणींचे माहेरघर आहे. दर महिन्याला ही ओवाळणी मिळणार असल्याचं वचन मुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलं.
ज्याच्या मागे ताई, त्याला कोणी थांबवू शकत नाही
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं आपल्या मागे लाडक्या बहिणींची कवचकुंडलं तयार झाली आहेत. ‘जाको राखे साईया, मार सके ना कोई. ज्याच्या मागे ताई, त्याला कोणी थांबवू शकत नाही, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला दिला. तसेच या योजनेपासून आम्ही कोणालाही वंचित ठेवणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
लाडक्या बहिणींच्या आशिर्वादाने पुन्हा महायुतीच सत्तेवर येईल
इलेक्शनपुरती ही योजना असल्याचे सांगणाऱ्या सावत्र भावांना आम्ही बजेटच दाखवलं. उद्या जर हे सावत्र भाऊ सत्तेत आले तर लाडक्या बहिणींचं अनुदान थांबवतील. परंतु, काळजीचं कारण नाही. लाडक्या बहिणींच्या आशिर्वादाने पुन्हा महायुतीच सत्तेवर येईल आणि ही योजना सुरू राहील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है!
तुमच्या खात्यात पैसे आले का, फॉर्म भरताना त्रास झाला का, कोणी पैसे मागितले का? ही योजना तुमच्यासाठी आहे. कुणालाही एक रूपाया द्यायचा नाही. आता तुम्हाला कोणाकडे पैसे मागायची वेळ येणार नाही. तुम्हाला कायम माहेरचा आहेर आणि ओवाळणी मिळत राहणार आहे. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं मुख्यमंत्री म्हणाले. पैशाचं काय करणार, असं मुख्यमंत्र्यांनी विचारताच जमा झालेल्या पैशातून मशिन घेणार, स्वतःचा व्यवसाय सुरू करणार, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरणार असल्याचं महिलांनी सांगितलं.