निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा जिल्हा दौरा, उद्या ‘या’ कार्यक्रमांना लावणार हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, राज्यात लोकसभेचा जागा वाटपाचा घोळ अजूनही मिटता- मिटेना असा झाला आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा मानला जाणारा सातारा जिल्हा हा आपल्याकडे कसा येईल यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून सातारच्या जागेबाबत ते नेमकी कोणती भूमिका जाहीर करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्ह्यातील मौजे दरे (ता. महाबळेश्वर) येथे साकारण्यात आलेल्या बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण, तसेच मौजे मुनावळे (ता. जावळी) येथील महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प आणि पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाैऱ्याला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा असून, महायुतीतून जागा सोडावी, अशी वारंवारं मागणी इच्छुक उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्याकडून केली जात आहे. या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात चढाओढ असल्याचे पहायला मिळत आहे.

लोकसभा मतदारसंघात भाजपचे – 2, शिवसेना (शिंदे) – 2 आणि अजित पवार गट- 1 तर शरदचंद्र पवार गटाचे – 1 आमदार आहेत. तरीही भाजपची ताकद वाढलेली असल्याने अशातच इच्छुक उमेदवार उदयनराजे भोसले यांना 2019 च्या पोटनिवडणुकीतील वचपा काढायचा आहे. यासाठी त्यांनी तयारी सुरू केली, तर 1999 पासून सातारा लोकसभेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असल्याने महायुतीत चढाओढ पाहायला मिळत आहे.