सातारा प्रतिनिधी | महाबळेश्र्वर तालुक्यातील दरे गावी मुक्कामी असलेल्या येथील निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी पर्यटन जिल्हा म्हणून सातार्याची ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी जी कामं करायची आहेत, ती भूमिपुत्र म्हणून मी करणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
महाबळेश्र्वर तालुक्यातील दरे तांब येथील निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्यासह नवीन महाबळेश्वर प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, या भागाचा कायापालट करणं हाच माझा उद्देश आहे. पर्यटनाला वाव असणारी ठिकाणे विकसित करणार आहे. याबाबत पर्यटनमंत्र्यांना पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. काही ठिकाणी मुख्यमंत्री, मी स्वत: पाहणी करायला जाईन. या भागाचा विकास, कायापालट करणे, आणि अमूलाग्र बदल घडवणे तसेच इतिहास, संस्कृती जोपासणं, वाढवणं हा देखील उद्देश आहे.
दरम्यान, यावेळी एमआरडीसीच्या अधिकार्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवीन महाबळेश्वर प्रकल्प कसा होणार आहे? नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये शासनाच्यावतीने काय काय सुविधा दिल्या जाणार आहेत? याबाबत प्रेझेंटेशन दाखवले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थित अधिकार्यांना काही सूचना केल्या तर ज्या काही अडचणी होत्या, त्यादेखील अधिकार्यांनी शिंदे यांना सांगितल्या.
प्रतापगडापासून ते पाटणपर्यंत हा प्रकल्प होणार असून या ठिकाणी विविध ठिकाणेही विकसित केली जाणार आहेत, तसेच या संपूर्ण परिसरामध्ये नवीन महाबळेश्वरच्या माध्यमातून पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे, याकडे या भागाचा भूमिपुत्र म्हणून माझे विशेष लक्ष असणार आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी वारंवार गावी येणार आहे, म्हणजे मी नाराज आहे, असे म्हणता येणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.