सातारा प्रतिनिधी | श्री. उतेश्वर यात्रेच्या निमित्ताने दरे या गावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत. दरम्यान, आज मुनावळेत पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत दुपारी १२ वाजता बैठक घेणार आहेत. दरम्यान, मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी कोयना जलाशयावरील तराफा सेवा मोफत ठेवण्यात आली आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटनवाढ, नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंबंधीची प्रक्रिया तसेच कोयना पर्यटन या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, यात्रेनिमित्त मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी भाविकांसाठी कोयना जलाशयावरील तराफा सेवा मोफत ठेवल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी उतेश्वरच्या यात्रेसाठी येत असतात. यानिमित्ताने दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी त्यांचे रविवारी सायंकाळी येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कुलदैवत असलेल्या उतेश्वर देवस्थानची यात्रा १३ ते १५ जानेवारी दरम्यान होत आहे. ते दरवर्षी आपल्या परिवारासह या यात्रेत सहभागी होत असतात. या यात्रेदरम्यान, आज वानवली उतेकर येथे श्री उतेश्वर यांचा घाणा कार्यक्रम होईल. रात्री नऊ वाजता श्री उतेश्वर देवाची पालखी यात्रा स्थळाकडे प्रस्थान करेल. पहाटे चार वाजता उतेश्वर पालखीचे मंदिरस्थळी आगमन होईल.
मंगळवारी सकाळी सात ते नऊदरम्यान श्री उतेश्वर देवाचा अभिषेक, त्यानंतर दुपारी चारपर्यंत पालखी दर्शन, यात्रास्थळी शिवलिंगाची पूजा व आरती सायंकाळी सहा ते आठदरम्यान श्री उतेश्वर दर्शनरांग, रात्री आठ वाजता दीपमाळ प्रज्वलन व यात्रा आरंभ, देवदेवतांचे आगमन, उत्सव मंचाचे उद्घाटन झाल्यावर रात्री १० वाजता ऑर्केस्ट्रा, रात्री १२ वाजता श्री उतेश्वर देवाचा छबिना कार्यक्रम, तळे भरणे कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम असे नियोजन असेल. दि. १५ रोजी सकाळी ६.३० वाजता श्री. उतेश्वर देवाचा शाही विवाह सोहळा, त्यानंतर श्री उतेश्वर पालखी दर्शन व सकाळी १२.३० ते चारदरम्यान यात्रा समाप्ती होईल.