कराड प्रतिनिधी । सातारा ते कराड मार्गावर गोटे गावच्या हद्दीत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या बँजो पार्टीच्या टेम्पोला आयशर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या धडकेत बॅन्जो पार्टीचा टेम्पो रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या टेम्पो (क्रमांक MH १५ CK ४४६६) हा उभा होता. यावेळी त्या ठिकाणाहून आयशर टेम्पो (क्रमांक KA ६५ १०६३) हा निघाला होता. यावेळी आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले. आणि टेम्पोने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या बॅंजो पार्टीच्या टेम्पोला जाऊन धडक दिली. यामध्ये बॅंजो पार्टीच्या टेम्पोमधील दहा ते बारा जणांपैकी पाच जण जखमी झाले. भीषण अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरातून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशन व हायवे पेट्रोलिंग व ॲम्बुलन्सला याची माहिती दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि हायवे पेट्रोलिंगचे दस्तगीर आगा ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अपघातातील जखमींना गोटे गावातील ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून ॲम्बुलन्समधून तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात पाठीमागून धडक दिलेल्या आयशर टेम्पोतील चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद करण्याचे काम पोलिसांकडूनरात्री उशिरापर्यंत सुरु होते.