पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला अचानक आग लागली; लाखो रुपयांचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील नांगरे वस्तीनजीक रविवारी पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला (एमएच-11-डीडी-6871) अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, कंटेनरचे 22 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत चालक सूर्यकांत सदाशिव यादव हे जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पॅकिंगचे साहित्य भरलेला कंटेनर महाबळेश्वर-विटा रस्त्याने भुईंज, पुसेसावळीमार्गे बंगळुरूकडे निघाला होता. चालक यादव यांनी लघुशंकेसाठी कंटेनर रविवारी पहाटे 5 च्या सुमारास वडगाव-चोराडे दरम्यानच्या नांगरे वस्तीनजीक उभा केला. कंटेनर सुरू ठेवून ते उतरले.

नंतर कंटेनरमध्ये बसल्यावर केबिनमध्ये धूर यायला लागला आणि आग लागून स्फोटासारखा आवाज झाला. त्यामुळे यादव यांनी चालकाच्या केबिनमधून बाहेर उडी मारली. आगीच्या झळांमुळे ते जखमी झाले आहेत. त्यांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. कंटेनरला आग लागल्याचे समजताच सुहास पिसाळ यांनी गावातील काही नागरिकांना फोन करून माहिती दिली.

त्यानंतर सुरेश पवार, संदीप पिसाळ, भास्कर जाधव, नाथा पाटोळे, सावकार मदने, पोलीस कर्मचारी राहुल सरतापे घटनास्थळी दाखल झाले. तेथून नजीक असलेल्या सूरज पवार यांच्या शेतातून पाण्याच्या पाइप जोडून, आग आटोक्यात आणली. कंटेनरमधील माल जगन्नाथ चव्हाण, रवींद्र पिसाळ, सुहास पिसाळ आणि ग्रामस्थांनी तातडीने उतरवल्याने आणखी नुकसान टळले.