कराड प्रतिनिधी | भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना पुरस्कारांनी गौरवण्यात येते. यावर्षी प्रत्येक तालुक्यातून एक अशा 11 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, रवींद्र खंदारे, विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर, श्री. आडे उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी पुरस्काराबाबत माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनी जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षकांची निवड करण्यात येते. 2023-24 या वर्षातील प्राप्त प्रस्तावांमधून समितीमार्फत मूल्यांकन करुन, प्रत्येक तालुक्यातून एक, अशा 11 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
‘ या शिक्षकांची झाली पुरस्कारासाठी निवड
आदर्श पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये सीमा सुरेश पार्टे, जिल्हा परिषद शाळा, महू (ता. जावळी), उर्मिला जालिंदर पवार, पारगाव (ता. खंडाळा), अमीन शब्बीर शिकलगार, वाघेश्वर (ता. कराड), रफीक अब्बास मुलाणी, बनपुरी (ता. खटाव), उद्धव रामचंद्र पवार, अनपटवाडी (ता. कोरेगाव), गजानन सुरेश धुमाळ, कृष्णानगर (ता. सातारा), सुरेश अरविंद मोरे, शेंदूरजणे (ता. वाई), लक्ष्मण धोंडिबा जाधव, दुधगाव (ता. महाबळेश्वर), गणेश हौसेराव पोमणे, माझेरी (ता. फलटण), चंद्रकांत दिनकरराव कांबळे, नाटोशी (ता. पाटण), आकाराम पोपट ओंबासे, शेवरी (ता. माण) या शिक्षकांना यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. 2022-23 आणि 2023-24 या वर्षांच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.