सातारा प्रतिनिधी | भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा सुरू आहे. संपूर्ण शैक्षणिक धोरण बदलणे ही फार मोठी प्रक्रिया असून या प्रक्रियेला विविध पातळ्यांवरून हिरवा कंदील मिळून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अजून किमान दोन वर्षे लागतील असे महत्वाचे विधान शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले.
सातारा येथे आज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख यांच्यासह रयत सेवक उपस्थित होते.
यावेळी चेअरमन दळवी यांनी हंगामी शिक्षकांसह बीएड शिक्षकांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा केली. राज्यभरात रयतच्या ज्या शाळा भाडेपट्ट्यावर आहेत त्या जमिनी स्वमालकीच्या करण्यासाठी रयत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.