सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांनी शैक्षणिक सहलींची पूर्वतयारी केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सहलींना परवानगी देण्यात येणार नसल्याचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पालक व शाळांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, नियोजित सर्व सहलींना मान्यता देण्याची मागणी होत आहे.
सहलींना संस्थेकडून मान्यता मिळते. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घेण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. एसटी डेपोकडून सहल मार्गाची आणि त्यासाठी भराव्या लागणाऱ्या अनामत रकमेची माहिती घ्यावी लागते.
डेपोकडून बसच्या उपलब्धतेनुसार सहलींसाठी तारीख दिली जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करावी लागते. अनेकदा चार-दोन विद्यार्थी सहलीस कमी पडतात. त्या सर्व सीट पूर्ण करण्यासाठी शाळांना तारेवरची कसरत करावी लागते. सर्व वर्गणी जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करावी लागते. डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांचे फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते.
विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा विमा काढावा लागतो. पालकांचे संमतिपत्र घ्यावे लागते. अनामत रक्कम भरून डेपोकडून सहलीची तारीख मिळाल्यावर सहलीदरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधांसाठी संबंधितांना पत्रव्यवहार करावा लागतो.