सातारा प्रतिनिधी | मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात सातारा आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी आलेल्या दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने ताब्यात घेतले. मायणी मेडिकल कॉलेज अपहार प्रकरणातून गुन्ह्यांची मालिका दाखल झालेली आहे. वडूज पोलिस ठाणे तेथून सातारा आर्थिक गुन्हे शाखा व पुढे ईडीपर्यंत यातील गुन्हे वर्ग झालेले आहेत.
दीपक देशमुख यांच्यावर मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणातून २०२३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, त्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले करत आहेत. देशमुख यांना संबंधित गुन्ह्यात उच्च न्यायालयात जामीन मिळाला आहे. सातारा आर्थिक गुन्हे शाखेत तपासासाठी हजर राहण्यासह त्यांना अटी व शर्तीवर हा जामीन मिळाला आहे.
दुसरीकडे दाखल एका अन्य गुन्ह्यात ईडी दीपक देशमुख यांच्या शोधात होती. देशमुख हे साताऱ्यात आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी जात असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. २७ ऑगस्ट रोजी त्यांनी हजेरी लावली होती, तसेच चार सप्टेंबर रोजीही हजेरी होती. या प्रकरणात देशमुख सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेत आले. तपासासाठी शाखेत गेल्यानंतर दोन मिनिटांमध्ये ईडीचे पथक त्यांच्यासमोर जाऊन थांबले. ‘हम ईडी विभाग से हैं,’ असे म्हणत त्यांचा ताबा घेतला. त्यानंतर देशमुख यांनी त्यांना सहकार्य करत असल्याचे सांगितले. सुमारे दीड तास तेथेच चौकशी केल्यानंतर ईडीचे पथक त्यांना घेऊन तेथून रवाना झाले.