सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या दीपक देशमुख यांच्या घरावर आज सकाळच्या सुमारास ईडीने छापा टाकला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणीतील मायणी मेडिकल कॉलेजचे सर्वेसर्वा देशमुख कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे पथक मायणीत दाखल झाले. देशमुख कुटुंबातील सदस्यांची चौकशी सकाळी सहापासून सुरू होती.
मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात दोन-तीन वर्षांपासून ईडीची चौकशी सुरू आहे. चौकशीअंतर्गत सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख व त्यांचे बंधू आप्पासाहेब देशमुख हे सुमारे दीड वर्षापासून अटकेत आहेत. तेव्हापासून या कुटुंबाची वारंवार चौकशी केली जात आहे. कागदपत्रे तपासणी, उलट तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाच शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ईडी पथक पुन्हा एकदा देशमुख कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी मायणीत दाखल झाले आहे.
या चौकशीत कुटुंबातील सदस्य व कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सकाळपासूनच अधिक वेळ ईडीचे अधिकारी देशमुख कुटुंबीयांच्या शिंदेवाडी रस्त्यालगत असलेल्या घरामध्येच असल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.