सातारा प्रतिनिधी । भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात कोरोना काळातील भ्रष्टाचाराची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख यांच्या घरावर ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी धाड टाकली आहे. ईडीच्या झोन-२ मुंबई कार्यालयातून दोन उच्च अधिकारी व त्यांच्यासोबत २२ सीआरपीएफच्या जवाणांनी सकाळी सात वाजता घरावर धाड टाकली. यावरून सध्या माण, खटाव विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी डॉ. दीपक देशमुख याच्या घरावरील ईडीच्या कारवाईबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी महत्वाची मागणी केली.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा दहिवडीत काल कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी डॉ. दीपक देशमुख यांच्या वरील कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी देशमुख म्हणले की, मायणीतील मेडिकल कॉलेजच्या संदर्भात स्थानिक लोकांनी हायकोर्टात काही याचिका दाखल केल्या. त्याबद्दल विधानभवनात देखील चर्चा झाली. अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप मन आणि खटावच्या लोकप्रतिनिधींच्यावर झालेले आहेत. जेव्हा अशा प्रकारचे आरोप एखाद्या लोकप्रतिनिधींवर झाल्यानंतर त्याने त्याच्याबद्दलचा खुलासार करून त्याच्यात तथ्य आहे कि नाही हे स्पष्टपणे सांगण्याची आवश्यकता होती. अनेक लोकांच्याकडून सातत्याने त्याच्याबद्दलची मागणी होत आहे.
दुर्दैवाने त्याबाबत काहीच खुलासा केला जात नाही. आज ते प्रकरण हाय कोर्टात सुरु असताना असे समजले की, मायणीतील याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. आणि कारवाई करत आहे. हि कारवाई होत असताना कायद्यानुसारयाचिका कर्त्यांना देखील योग्य ती संधी मिळालाय पाहिजे. दोन्ही बाजूच्या लोकांना योग्य ती संधी मिळून जे सत्य आहे ते लोकांच्यासमोर आले पाहिजे. जेणे करून लोकांच्यात संभ्रम बाजूला होईल. याबाबत सरकारने लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावे आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या परकरणाबाबत जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांच्यासमोर येऊन सांगावी, असे देशमुख यांनी यावेळी म्हटले.