साताऱ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ई-बसेस दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर 5 वातानुकूलित ई-बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस येत्या आठवडाभरात सातारा – स्वारगेट मार्गावर धावणार आहेत.

सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, पारगाव खंडाळा, फलटण, वडूज, दहिवडी, कोरेगाव या 11 आगारात सध्याच्या घडीला 686 बसेस कार्यरत आहेत. त्यापैकी 10 वर्षे ओलांडलेल्या 300 बसेस आहेत. तर 30 हून अधिक बस बंद आहेत. तसेच दररोज 650 हून अधिक बसेस मार्गावर धावत असतात. कालबाह्य झाल्याने अनेक बस विविध मार्गावर बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशामधून नाराजी व्यक्त होत आहे.

शासनाने विविध सवलती जाहीर केल्याने एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढल्याने एस. टी. फायद्यात येवून लागली आहे. राज्य शासनानेही एसटी महामंडळ फायद्यात येण्यासाठी ई-बस सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व महामंडळाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ई बस सेवा सुरू केली आहे. त्यानुसार रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर सातार्‍यात 5 ई बस सोमवारी दाखल झाल्या आहेत. सातारा आगारात ई-बस चार्जिंग करण्यासाठी पॉईंटची उभारणी करण्यात आली आहे.

35 प्रवासी क्षमतेच्या ई- बस

पर्यावरण पूरक अशा ओलेक्ट्रा कंपनीच्या ई-बसेस आहेत. या सर्व बसेस वातानुकूलित असून ऑटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत. या गाड्यांमध्ये साधारण 35 प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सातारकरांचा प्रवास वातानुकूलित व आरामदायी होणार आहे. या बसेसमुळे इंधनाचा खर्चही कमी होणार आहे.

येत्या आठवडाभरात धावणार

या ई-बसची कागदोपत्री पूर्तता व आरटीओकडून पासिंगची कार्यवाही झाल्यानंतर सातारा स्वारगेट मार्गावर या बसेस येत्या आठवडाभरात धावणार आहेत.सातारा जिल्ह्यातील सातारा, पाटण, वडूज, वाई, महाबळेश्वर व फलटण आगारात ई बसेससाठी चार्जिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी सातारा आगारातील चार्जिंग पॉईंटचे काम पूर्ण झाले असून, अन्य ठिकाणची कामे अद्यापही सुरू नाहीत.