कराड प्रतिनिधी | उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या पथकाने शुक्रवारी कराड, मलकापूर परिसरातील कॅफेंवर कारवाईचा धडाका सुरू केला. चार स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत अनेक जोडपी पोलिसांच्या छाप्यात सापडली. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून वारंवार सुचना देऊनही प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या कॅफे चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे अवघ्या दोन तासांच्या कारवाईत दहा कॅफेंवर कारवाई करण्यात आली आहे.
कराड, मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी आडोशाला तर सेवारस्त्यालगत कॅफेंची संख्या वाढली असून या कॅफेंमधे प्रेमीयुगूले तासन् तास अश्लिल चाळे करत बसलेली असतात. यातून एखादा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक यापुर्वी यातून असे काही गंभीर गुन्हे घडले आहेत. यासंदर्भात पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या वेशातील पोलिसां मार्फत खात्री करून एकाचवेळी चार पथकांकडून कारवाई करण्याची व्युहरचना आखली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, साक्षात्कार पाटील, यांच्यासह संतोष सपाटे, आसिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयूर देशमुख, अनिकेत पवार, महिला पोलीस कांचन हिरवे, ज्योती काटू, वैशाली यादव, धनश्री माने या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली चार पथके तयार करून ती कॅफेच्या परिसरात अचानक पाठवण्यात आली. एकाचवेळी कारवाई झाल्याने कॅफेचालकांची चांगलीच पाचावर धारण बसली. कॅफेच्या नावाखाली सुरू असलेले अश्लिल उद्योगास प्रोत्साहन देण्याचे प्रकार उघडकीस आले.
पोलीस उपअधिक्षक ठाकूर यांनी कॅफे चालक मालकांसह तिथे असलेल्या जोडप्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार कॅफेत आढळलेल्या जोडप्यांवर मुंबई कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून कॅफे चालक मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.यापुढेही गैरप्रकार चालणारे कॅफेंवर कारवाई सुरूच ठेवावी असे आवाहन पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी केले आहे.